Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

माणूस हा समतेचा वाहक आणि प्रचारक  – बिशप थॉमस डाबरे

पुणे :  समतेची आणि मानवतेची मशाल घेऊन आपण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करायला हवी. कारण समता आणि मानवता या संदेशाचा वाहक प्रचारक हा माणूस आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यामुळे या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खरी राष्ट्रनिष्ठा असणाऱ्यांची गरज आहे. देशात मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज आहेत. परंतु खरी राष्ट्रनिष्ठा असणारे मुस्लिम बांधव हे राष्ट्रासाठी संपत्ती आहेत, असे मत पुणे धर्मप्रांताचे डॉ. बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले.
डायाॅसिस ऑफ पुणे, स्वच्छंद पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने दिवाळीनिमित्त सर्वधर्मीय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रेसकोर्स जवळील बिशप हाऊस येथे हा स्नेह मेळावा झाला. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, आझम कॅम्पसचे डॉ. पी. ए. इनामदार, सिस्टर लुईसा, फादर डेनिस, फादर राजेश बनसोडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ए.पी. कुलकर्णी, प्रा.रवींद्र शाळू उपस्थित होते. डॉ. बिशप थॉमस डाबरे यांचा वाढदिवस देखील यावेळी  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन मोहन जवळकर, रॉकी गोम्स व नोएला डेव्हिड यांनी केले.
डॉ. बिशप थॉमस डाबरे म्हणाले, सर्व धर्मांचे सण आपण एकत्रित साजरे करायला पाहिजेत. दिवाळी, रमजान, ख्रिसमस हे सण फक्त एका धर्मापुरते मर्यादित राहू नयेत. समाजामध्ये आनंद निर्माण करणारे हे सण प्रत्येक धर्मातील व्यक्तीने एकत्र येत साजरे करायला पाहिजे.
डाॅ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, आपण सर्व भारतीय एकत्र नांदतोय याला संविधान कारणीभूत आहे. वैयक्तिक पातळीवर कोणत्याही धर्माचे पालन आपण करू शकतो. परंतु सामाजिक जीवनात वावरताना आपण सर्वजण भारतीय आहोत अशी भावना  प्रत्येकाने ठेवायला हवी.
डॉ. अनिल कुलकर्णी म्हणाले, देशाच्या एकजुटीसाठी संविधान फार महत्त्वाचे आहे. देशातील सर्व धर्म मोठे आहेत. बंधूभावाने वागा हाच संदेश प्रत्येक धर्माने दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading