राष्ट्रीय एकात्मतेचा सद्भाव प्रत्येकाने जोपासावा – उस्ताद राशिद खान यांचे मत
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उस्ताद राशिद खान यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता ‘सूर्यदत्त’च्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
हॉटेल सयाजी येथे झालेल्या या छोटेखानी सोहळ्यावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माळवदकर, संगीतकार उदय देशपांडे, आर्थिक सल्लागार हर्षवर्धन देशपांडे, प्रा. सायली देशपांडे, शिवराज माळवदकर आदी उपस्थित होते.
राशिद खान म्हणाले, “संगीत, गायनाच्या माध्यमातून देशसेवा करत आहे. शास्त्रीय संगीत समजून घेतले पाहिजे. संगीत-कला माणूस जोडण्याचे काम करते. सर्वधर्मसमभाव नव्या पिढीला शिकवायला हवा. भारतासारखी भूमी जगात कुठेही नाही. त्यामुळे आपण भारतात जन्मल्याचा आनंद वाटतो.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “उस्ताद राशिद खान साहेबांचे संगीत क्षेत्रातील योगदान भारत वासीयांसाठी प्रेरक आहे. त्यांची संगीत साधना रसिकांना मंत्रमुग्ध करते. त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो. ‘सूर्यदत्त’ कॅम्पसला भेट देऊन आमच्या विद्यार्थ्यांना खानसाहेबांनी मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.”
रवींद्र माळवदकर यांनी देशात सर्वधर्मसमभाव जोपासण्याची गरज असल्याचे सांगितले. उदय देशपांडे यांनी उस्ताद राशिद खान साहेबांविषयी गौरवास्पद मनोगत व्यक्त केले.
