Mumbai – ‘सिडको’कडून ८ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट
मुंबई: सिडकोने सर्वसामान्यांना दिवाळीची भेट दिली आहे. सिडकोने ७८४९ परवडणा-या घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. ही घरे नवी मुंबई विमानतळाच्या परिसराजवळ आहेत. सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनादेखील होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधत सिडकोच्यावतीने घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली.
उद्यापासून या घरांच्या लॉटरीसाठी नोंदणी करता येणार आहे. सिडकोच्या या लॉटरीच्या माध्यमातून सामान्यांना नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
सिडकोने लॉटरी जाहीर केलेली ७८४९ घरे ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व २, ए २ बी आणि पी3, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहे.
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात येत असलेली गृहसंकुलामध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहे.
