Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सत्तांतर होताच टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट

पुणे: पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल झालेल्या राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चीट देत या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर केला आहे. याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे सत्ता बदल होताच पोलिसांची भूमिका बदलली असल्याचे दिसत आहे.

पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय तार अधिनियम कलम २६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचे नेंते नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अमली पदार्थ विक्रेत्या टोळीवर कारवाई करण्याचे कारण दाखवून हे फोन टॅप केले होते.

गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. फोन टॅपिंग करण्यासाठी जे मोबाइल क्रमांक निवडण्यात आले होते. तत्कालिन खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख तसेच संजय काकडे यांचे मोबाइल क्रमांक अनिष्ट राजकीय हेतूने टॅप केल्याचे पोलीस महासंचालकांच्या समितीच्या चौकशीतून समोर आले होते. या समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीतील सर्व फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी केली.

पडताळणीत पुणे पोलीस आयुक्तालयाने २०१७ ते २०१८ या कालावधीत चार लोक प्रतिनिधींचे सहा मोबाइल क्रमांक टॅप केल्याचे ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास बंद केला आहे. न्यायालयात या गुन्ह्याचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading