fbpx

पुण्यात होणार पॉटरी कलेचा भव्य महोत्सव

पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात कला रसिकांसाठी नेहमीच विविध सांगीतिक, नृत्य आणि चित्रकलेचे महोत्सव, कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते. मात्र कलात्मक रचनेतील मातीच्या भांडी’चे महोत्सव पाहायला मिळणे दुर्मिळच आहे. परंतु, लवकरच सुबक आकारातील मातीची भांडी, त्यावर केलेले बारीक नक्षीकाम आणि विविध रंगसंगतीच्या वापराने आकर्षक अशा वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी पुण्यातील कला रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे, ‘पुणे पॉटर्स मार्केटस २०२२’ या खास स्टुडीओ पॉटरीकलेच्या महोत्सवाचे.

‘आयजीए गॅलेरीया’ व भूमी पॉटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव ७,८,९ ऑक्टोबर आणि १४, १५ १६ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे होणार असून, सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. याठिकाणी कला रसिकांना देशभरातील ४० ‘स्टुडीओ पॉटरी’ कलाकार आणि महोत्सवातील प्रत्येक भागात २० कलाकारांच्या अतिशय दुर्मिळ आणि मोजक्या स्वरूपातील अशा कलाकृती पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

पॉटरीकला विश्वातील अतिशय नावाजलेले कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत, यामध्ये रुबी झुनझुनवाला, शालन डेरे, गौरी गांधी, मनप्रीत निश्चर, वीणा चंद्रन, आणि लिडविन मास्करन्हास या नामवंत कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांना भेटण्याची, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी या महोत्सवात रसिकांना मिळणार आहे. तसेच ही कला शिकू इच्छीणाऱ्या कलाप्रेमींसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजनही केले जाणार आहे. या अनोख्या महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील रसिक प्रेक्षकांना या कला संस्कृतीचे दर्शन घडेल, त्याचबरोबर पॉटरी कलाकारांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी एक व्यापक व्यासपीठदेखील उपलब्ध होणार आहे.

‘या महोत्सवाबाबत आयजीए गॅलेरीया’चे इंद्रनील गेराई म्हणाले, “ पॉटर्स मार्केट्स’ने आज भारत आणि जगभरातील विविध शहरांमध्ये स्टुडिओ पॉटरी’चे प्रदर्शन आयोजित करणारे एक व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या पॉटर्स मार्केट’चे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी सामान्यपणे दुकानांमध्ये उपलब्ध असलेली मातीची भांडी नसतात, तर पॉटरी कलाकारांनी घडवलेल्या सुबक, आकर्षक नक्षीकामाने संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दुर्मिळ कलाकृती पाहायला मिळते. ‘पुणे पॉटर्स मार्केट २०२२’ हा एक अनोखा कला उपक्रम आहे, जो ‘पॉटरी’ ही कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. कला सल्लागार या नात्याने, व्हिज्युअल लर्निंग आणि सौंदर्यविषयक जागरुकतेच्या माध्यमातून समाजाला उच्च दर्जाच्या अभिजात कलेची जाणीव करून देणे ही आमची जबाबदारी आहे, असे आम्हाला वाटते.

Leave a Reply

%d bloggers like this: