fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

‘मी शांता आजी’ काव्यनाट्यातून मुलांनी लुटला आनंद


पुणे : प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या कविता, गीतांवर नाचत-बागडत शाळकरी मुलांनी आज अनोखा आनंद लुटला. निमित्त होते ते गायन, नृत्यावर आधारित ‘मी शांता आजी’ या ‘काव्यनाट्य’ कार्यक्रमाचे!
शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता दि. 12 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निमित्ताने नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन भरत नाट्य मंदिरात करण्यात आले होते. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या नाट्यप्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी चाळीस विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. राज्य बालनाट्य स्पर्धेत पुणे केंद्रात प्रथम क्रमांक मिळालेल्या ‘जीर्णोद्धार’चे सादरीकरणही या प्रसंगी करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीता बर्वे यांचा या वेळी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘गणराज रंगी नाचतो’ या गीताने झाली. शांता आजींशी संवाद साधत-साधत ‘फुगेराव’, ‘खोडी माझी काढाल तर’, विहिण बाई उठा’, ‘नंबर फिफ्टी फोर’, ‘शूर आम्ही सरदार’ आणि ‘ऋतू हिरवा’ या गीतांवर मुलांनी नृत्य सादर करून दाद मिळविली. मुलांच्या भावविश्वातील विषय या अनोख्या कार्यक्रमातून मांडण्यात आले.
बालनाट्याच्या लेखिका संध्या कुलकर्णी, दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी तसेच तंत्रज्ञ पुष्कर देशपांडे, अभिजित इनामदार, श्रेयस चौधरी, राधिका देशपांडे, बालनाट्यातील कलावंत शर्व दाते, दृष्टी मोरे, सई भोसले, सई गुरव, अनिषा कसाबे, रितिका कसाबे, अर्चिस थत्ते, ओजस पाटील, श्रीजय देशपांडे, प्रज्ञेश गोसावी यांचा त्यांच्या पालकांसह संगीता बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कलेच्या माध्यमातून चांगला माणूस घडतो, असे सांगून संगीता बर्वे म्हणल्या, शब्दांशी कसे खेळावे याचे प्रशिक्षण नाट्यसंस्कारच्या माध्यमातून अनेक वर्षे दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी नियमित सराव केल्यास भविष्यास उत्तम संधी मिळू शकतात. ‘जीर्णोद्धार’ बालनाट्याच्या सादरीकरणाचे कौतुक करून शाळेविषयीची आठवण सांगताना त्यांनी ‘नदी काठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी, दप्तर कधी वाटले नाही पाठीवरचे ओझे, नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश नव्हते बुट-मोजे’ ही कविता सादर केली. ‘काव्यनाट्य’विषयी बोलताना बर्वे यांनी शांता शेळके यांच्याविषयीची आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: