सैनिक व पोलिसांचे काम एकसारखेच खडतर – ब्रिगेडियर (निवृत्त) सुनील लिमये
पुणे : देशाच्या सिमेवर ज्याप्रमाणे भारतीय सैनिक देशरक्षणाची सेवा देतात. त्याप्रमाणे पोलीस हे अंतर्गत भागात समाजरक्षणासाठी सेवा देतात. सैनिकांप्रमाणे पोलिसांना देखील आपल्या कुटुंबाला वेळ देता येतोच असे नाही. या दोन्ही घटकांमुळे आपण आज सुखात व आनंदात आहोत. त्यामुळे सैनिक आणि पोलिसांचे काम एकसारखेच व खडतर आहे, असे मत ब्रिगेडियर (निवृत्त) सुनील लिमये यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला होता. उत्सवात विश्रामबाग पोलीस स्टेशनला बॅरिगेटस भेट देण्यात आली. यावेळी परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे, तानाजी जाधव, रमेश मोरे, वैशाली ढमढेरे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, शुभम मालुसरे, दिनेश पिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बॅरिगेटसचे देखील पूजन करण्यात आले.
सुनील लिमये म्हणाले, प्रत्येक नागरिकाने शिस्त पाळली, तर पोलिसांचा त्रास कमी होवू शकतो. याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. आज कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. पोलिसांचा निम्म्याहून अधिक वेळ वाहतुकीला व नागरिकांना शिस्त लावण्यात जातो. आपण पोलिसांचा हा त्रास कमी करायला हवा.
डॉ.प्रियंका नारनवरे म्हणाल्या, पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपत आहे. केवळ परमेश्वराची भक्ती न करता, सामाजिक भान जपण्याच्या ट्रस्टचा विचार कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यातूनच परमेश्वराच्या मूर्तीला देवपण देण्याचे काम केले जात आहे. पोलिसांना गणेशोत्सवात मोठया प्रमाणात बॅरिगेटस्ची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले.
