सैनिक आणि भारतवासियांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम व्यक्त करणारे माध्यम म्हणजे राखी – निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी
पुणे : सिमेवरील सैनिकांसाठी त्यांच्या घरुन राखी येते, ती पोस्टाने किंवा प्रत्यक्षपणे आली, तरी हा त्यांच्यासाठी भावनास्पर्शी प्रसंग असतो. त्यावेळी सैनिक आणि भारतवासियांचे एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त होते. आपल्या मागे आपला संपूर्ण देश उभा आहे, ही भावना सैनिकांपर्यंत राखीच्या माध्यमातून पोहोचणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर या संस्थेच्यावतीने जम्मू आणि कश्मिरमधील सैनिकांकरीता दिव्यांगांनी बनविलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या रवाना करण्यात आल्या. राख्यांचे पूजन सोमवार पेठेतील सुयश हॉटेलसमोर असलेल्या पद्मसुंदर बेकरी येथे झालेल्या कार्यक्रमात दृष्टीहिन मुले व प्रसाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विद्या गायकवाड, प्रशांत टिळेकर,अर्पिता चंडेल, हेमंत जाधव, डॉ.स्वप्नील शेठ, अखिल झांजले, संतोष फुटक, सुभाष सुर्वे,विक्रम मूर्ती, रामदास लढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला मूर्तीज् प्रोडक्टचे देखील सहकार्य लाभले.
ब्रिगेडियर प्रसाद जोशी म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेथे पोस्टिंग होईल, त्याठिकाणी भारतीय सैनिक देशाच्या सिमांचे रक्षण करीत असतात. प्रत्येक सैनिकाला स्वत:च्या अपेक्षेप्रमाणे हवे तेव्हा, आपल्या घरी जाता येतेच असे नाही. त्यावेळी त्याला घरुन किंवा देशवासियांकडून राखी आली. तर, त्याची स्फूर्ती वाढते. राखीपौर्णिमेसारखे सण जवानांचे मनोबल वाढविणारे सण आहेत.
हेमंत जाधव म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील सांबा सेक्टर, डोडा, रियासीसह विविध भागांतील सैनिकांना या राख्या आम्ही बांधणार आहोत. नेहमीच्या राख्यांपेक्षा चॉकलेटच्या राख्या जवानांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाकरीता अनेक संस्थांनी सहकार्य केले असून जम्मू काश्मिरमधील जनरल झोरावर सिंग ट्रस्टचे देखील सहकार्य लाभले आहे.
