संजय राऊत यांना ईडी ने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
पुणे:मुंबई मधील पत्राचाळ प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी हजर झाले होते. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आक्रमक झाली असून . पुण्यात शिवसेनेने संजय राऊत यांना ईडी ने ताब्यात घेतले म्हणून निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे वीर सावरकर पुतळा, सारसबाग आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप हमको डरती है ईडी को आगे करती है अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी केले. या आंदोलनाला शिवसेनेचे विशाल धनवडे,गजानन थरकुडे, सुरज लोखंडे, सचिन जोगदंड,युवराज पारिक, तानाजी लोकरे, आबा कुंभारकर युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय मोरे म्हणाले,देशासह राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करण्याची एकही संधी केंद्रातील सरकार सोडताना दिसत नाही. ईडी हे एकप्रकारे सरकारच्या हातातील बाहुलं झालं आहे. ते रोज कोणाच्याही घरात घुसतं आणि काहीतरी बाहेर काढतं असं झाल्याचं त्यांनी सांगितलं. पण भाजप नावाचं वॉशिंग पावडर आलं की सगळेच साफसुधरे होतात.
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई करण्यामागे केंद्राचं मोठं षडयंत्र आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर दडपण आणण्यासाठीची ही कारवाई करण्यात आल्याची टीका संजय मोरे यांनी केली.
