fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘तो, ती आणि फुजी’ या रोमँटिक सिनेमात झळकणार ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले!

‘प्लॅटून वन फिल्म्स’ने नुकतीच आपल्या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तो, ती आणि फुजी’ असं शीर्षक असणाऱ्या ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या ह्या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. ललित आणि मृण्मयीची लोकप्रिय जोडी ह्या आधी ‘चि. व चि. सौ. का’ ह्या चित्रपटात बघायला मिळाली होती.

मोहित आपल्या ‘तो, ती आणि फुजी’ ह्या नव्या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलतांना, ह्याला प्रेमाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा शोध घेणारा प्रवास म्हणतो. तो पुढे आणखी म्हणतो की, “सध्याच्या गुंतागुंतीच्या शहरी जीवनात सहज, सुंदर आणि नैसर्गिक प्रेमाची जागा मोजूनमापून केलेल्या कृत्रिम प्रेमाने घेतली आहे. पण खरा प्रश्न तर हा आहे, की नेमकं प्रेम गुंतागुंतीचं आहे की प्रेमात पडणारी माणसं?

चित्रपटाची कथा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन पात्रांभोवती फिरते. पात्रांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा, त्यांची वेगवेगळी जीवनमुल्यं आणि एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा ह्यांमुळे त्यांच्या नात्याचा कडवट शेवट होतो. पण पुन्हा सात वर्षांनी ही दोन पात्रं अनपेक्षितपणे एकमेकांसमोर येतात. त्यावेळी त्यांच्यासमोर असतात एकमेकांची वेगळ्या वाटेवरची आयुष्यं आणि त्यामुळे तयार झालेल्या नव्या अडचणी.

 इरावती म्हणते की, “आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला मनापासून हवं असलेलं प्रेम निसटून गेलेलं असतं. आणि आपण सतत मागे बघून त्या प्रेमाच्या कडू-गोड आठवणींमध्ये रमत असतो. मला वाटतं की, हा चित्रपट बघून प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या अपयशी ठरलेल्या पण उत्कट असणाऱ्या प्रेमाची आठवण उफाळून येईल.”

शिलादित्य बोरा आणि राकेश वारे ही जोडी ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाची निर्मिती करीत असून, ह्या वर्षाअखेरीस चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. नेहमीच आशयप्रधान चित्रपटांची मांडणी करणाऱ्या शिलादित्य बोरा ह्यांची निर्मिती असलेल्या ‘पिकासो’ ह्या चित्रपटाला २०२०मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच त्यांनी सोनी राझदान, पंकज त्रिपाठी आणि अहाना कुमरा ह्यांच्या भूमिका असलेल्या, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजोय नाग ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘युअर्स ट्रुली’ ह्या सिनेमाचीही निर्मिती केली होती. ‘युअर्स ट्रुली’चा प्रीमिअर २०१८ च्या ‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’झाला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading