डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप’ चे वितरण
पुणे : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘तेर पॉलिसी सेंटर’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यंग रिसर्च फेलोशिप ‘ चा वितरण समारंभ माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांच्या स्मृतिदिनी २७ जुलै २०२२ रोजी सकाळी ऑनलाईन पार पडला. ६ युवा संशोधकांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. या फेलोशिपचे हे चौथे वर्ष आहे. या फेलोशिपसाठी देशभरातून १५०० प्रवेशिका आल्या होत्या.
युनेस्कोचे माजी प्रकल्प संचालक आणि मुबीस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राम भूज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयुष श्रीवास्तव,अरविंदन एन.,पूजा शर्मा हे २५ हजार रुपये रकमेच्या फेलोशिपचे मानकरी ठरले. चयनीका पाठक,यश माने,तेजस वन्नलवार हे ज्युरींतर्फे दहा हजार रुपये रकमेच्या फेलोशिपसाठी निवडले गेले .पर्यावरण संवर्धन-संरक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात येते.या फेलोशिप उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.डॉ.सुनील शास्त्री, डॉ. सतीश कुलकर्णी, अनील अरोरा यांनी परीक्षण केले.
डॉ.राम भूज यांनी युवा संशोधकांचे अभिनंदन केले.ते म्हणाले,’युवा संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा तेर पॉलिसी सेंटरचा उपक्रम अतिशय उल्लेखनीय आहे.ही फेलोशिप म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्वल प्रवासाची सुरुवात आहे.ग्लोबल वॉर्मिंग,क्लायमेट चेंज अशा अनेक आणीबाणीच्या गोष्टी,संकटे आपल्या वाट्याला आल्या आहेत.यावर उपाय म्हणून चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे.शिक्षणात सुधारणा करत गेले पाहिजे. त्यातून शाश्वत विकासाच्या संकल्पना आणि पर्यावरण प्रेम शिकवता येईल. युवकांसाठी अशा अनेक प्रोत्साहनात्मक उपक्रमांची गरज आहे.युवकांची प्रेरित मने एकत्र आली तर त्यातून पृथ्वीचा विनाश टाळता येईल’.
डॉ.सुनील शास्त्री म्हणाले,’ढासळते पर्यावरण हा काळजीचा विषय आहे.अन्न,पाणी,हवा,माती अशा सर्वच गोष्टींची गुणवत्ता उत्तरोत्तर कमी होत असून प्राधान्याने पर्यावरण रक्षणाचे उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.’
‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे म्हणाल्या,’ डॉ कलाम यांचे भारताविषयीचे प्रेम,भारत महासत्ता व्हावा यासाठीचा ध्यास प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार रुजावे यासाठी फेलोशिप उपक्रम हा प्रयत्न आहे.गेल्या ४ वर्षांत २५ पेक्षा जास्त युवकांना ही फेलोशीप तेर पॉलिसी सेंटर या संस्थेमार्फत दिली आहे.समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन संशोधनाला प्रोत्साहन द्यायला उपयोग होत आहे.’ स्नेहा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
