fbpx

पुणेकरांना मोठा दिलासा एका दिवसाड पाणी कपात रद्द

पुणे:अवघ्या दहा ते 12 दिवसांच्या पावसाने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 20 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे, महापालिकेने 1 जुलै रोजी घोषणा केलेली दिवसाआड पाणीकपात अखेर मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे, शहरात या पुढे नियमित पाणी देण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनिरूध्द पावसकर यांनी दिली.

शहरात दरवर्षी प्रमाणे वेळेवर हजेरी लावलेल्या मान्सूनने जून महिन्यात दडी मारली होती. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील एकूण 30 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात अवघे 2.50 टीएमसी पाणी शिल्लक होते. तर जुलैच्या पहिल्या आठवडयातही पाऊस नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने शहरात दि. 4 ते 11 जुलै या कालावधीसाठी दिवसाआड पाणी पुरवठ्याची घोषणा केली होती. ही कपात सुरूही झाली,मात्र, आषाढी एकादशी आणि बकरी ईद मुळे ही कपात 8 जुलैपासून रद्द करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी धरणांची स्थिती लक्षात घेऊन 11 जुलैनंतरचा निर्णय जाहीर केला जाणार होता.

सुदैवाने ज्या दिवशी पाणी कपात लागू करण्यात आली त्याच्या एक दिवस आधीपासून धरणसाखळीत चांगला पाऊस सुरू झाल्याने 2.51 टीएमसीपर्यंत खाली आलेला पाणीसाठा 10 जुलै पर्यंत 7 टीएमसीच्या घरात पोहचला आहे. तसेच 11 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने या पाणीसाठयात मोठी वाढ होण्याची शक्‍यता असल्याने पालिकेने 11 जुलै रोजी पाणीकपात 26 जुलै पर्यंत स्थगित करत पुढील निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. मात्र, 22 जुलै अखेर हा धरणसाठा तब्बल 20 टीएमसी झाला असून अजून दोन महिने पावसाळा आहे. त्यामुळे ही चारही धरणे 100 टक्के भरण्याची शक्‍यता असल्याने महापालिकेने अखेर दिवसाआड पाणीकपातीची घोषणा मागे घेतली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: