fbpx

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना ‘शैक्षणिक’ पाठिंबा महत्त्वाचा – डॉ. मधुसूदन झंवर

पुणे : ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजासाठी काम करण्याची आपली जबाबदारी आहे ही वागणूक बालपणीच आम्हाला मिळाली होती. शिक्षणामुळे माणूस आयुष्यातील कोणतेही ध्येय गाठू शकतो. त्यामुळे केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षणाचा पाठिंबा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठिंबा देऊन उद्याचे उज्ज्वल नागरिक तुम्ही घडवत आहात, असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील १५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व सोहळा २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आॅडिटोरियम येथे करण्यात आले. यावेळी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. पुणेचे ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, जुगलकिशोर  पुंगलिया, श्यामसुंदर कलंत्री, राजेश कासट, दादा गुजर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी, दुर्गेश चांडक आदी मान्यवर उपस्थित होते. 

कृष्णकुमार बूब म्हणाले, जेव्हा मला या उपक्रमाची माहिती मिळाली तेव्हा अत्यंत अभिमान वाटला. गरजू विद्यार्थ्यांना फक्त मदत करण्यापेक्षा त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांना संस्था खूप मोठी मदत करत आहे. शैक्षणिक आधार बरोबर सामाजिक कायार्ची बीजे देखील त्यांच्यामध्ये रुजवत आहे, अशा संस्थांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू. निरंजन सेवाभावी संस्थेने भविष्यात केलेल्या प्रत्येक प्रकल्पास आमचे सहाकार्य राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जुगलकिशोर पुंगलिया म्हणाले, शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची कमतरता नसते, परंतु दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे अत्यंत कष्टाने शिक्षण पूर्ण करावे लागते. दुष्काळग्रस्त ,आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील मुलांना अनेकदा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य होत नाही.त्यांना मदत देणे गरजेचे आहे.

मराठवाड्यातील २०० गरजू विद्यार्थ्यांना पुण्यातील कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, तोरणं, मुळशी, तिकोना, तुंग, लोहगड आणि पौड परिसरातील गांवांमधील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्यात आले आहे.  प्रमोदकुमार जाजू यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गेश चांडक यांनी प्रास्ताविक केले. मुकेश माहेश्वरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: