अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात अटक वॉरंट जारी
बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातून अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अमिषा पटेलवर कार्यक्रमाचे पैसे घेऊनही कार्यक्रमाला पोहोचली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. मुरादाबादमधील एका इव्हेंट कंपनीने अभिनेत्रीवर हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता मुरादाबाद कोर्टाने २० ऑगस्टला एसीजेएम- ५ कोर्टात हजर राहण्याचे आदेश तिला दिले आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील ड्रीम इव्हेंट कंपनीचे मालक कुमार वर्मा यांनी अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ला मुरादाबादमधील एका लग्नात अमिषा पटेलला डान्स करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी तिला ११ लाख रुपयेही देण्यात आले होते. मात्र अभिनेत्री अमिषा पटेलने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, तसेच त्यांचे पैसेही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. याच गुन्ह्यात आता अभिनेत्रीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अभिनेत्री अमिषा पटेल आता चांगलीच अडचणीत आली असल्याची चर्चा रंगली आहे…