Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

परमेश्वर व जीव यामध्ये नांदणारी आनंद प्रतीती म्हणजे संत – ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर

पुणे : संतांची मांदियाळी का झाली, तर परमात्मा पांडुरंग रूपाने प्रकट झाले म्हणूनच झाली. जगद्गुरु तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली मध्ये पांडुरंग दिसले. परमेश्वर व जीव यामध्ये नांदणारी आनंद प्रतीती म्हणजे संत. नीज ज्ञानाची सुख भोग अवस्था म्हणजे संत होय, असे मत ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी जगद््गुरु तुकाराम महाराजांचे निवडक अभंग याविषयावर निरुपण केले.

चिन्मय महाराज सातारकर म्हणाले,  परमेश्वराने जगत निर्माण केले असे नाही, तर परमेश्वरच जगत आहे. परमेश्वर जगतात विस्तार पावलेला आहे. त्यामुळे परमेश्वर कुठे आणि जगत कुठे हे सांगताच येत नाही. जगत, जीव, परमात्मा सगळे एकच आहे. भिन्न रूपाने प्रकट झाले म्हणजे स्वरूप बदलले असे नाही.

ते पुढे म्हणाले, सर्वव्यापी तत्वाला ज्ञान म्हणतात. पण ज्ञान नुसते असून उपयोग नाही, ते प्रकट होणे गरजेचे आहे. भिन्न रूपात प्रकट झाल्यावरच त्याचा खरा आनंद दिसतो. आनंदाचे व्यक्त दर्शन म्हणजे जगत आहे. जग आनंद स्वरूप आहे. पण आपल्या दृष्टीतील पाहण्याच्या फरकांमुळे ते वेगवेगळे दिसते. आनंदाची चव प्रत्येक जीवांसोबत स्वयंभू आहे.

चातुर्मास प्रवचनांतर्गत संपूर्ण हरिपाठ याविषयावर दिनांक १७ ते ३१ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत प्रवचने होत आहेत. यामध्ये ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर व ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर या निरुपण करीत आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading