fbpx

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय वारीच्या जल्लोषात मोठ्या उत्साहाने सामील

पुणे : पंढरपूर वारीत या वर्षी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व वर्शिप अर्थ फाउंडेशन यांनी सहभागी होऊन “वारी पंढरीची, वारी लोकशाहीची ” या अभिनव उपक्रमाची घोषणा केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी” निमित्ताने उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. लोकशाही रथाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, व्यवस्थापन समिती सदस्य  राजेश पांडे, डॉ.संजय चाकणे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्रीमती. मृणालिनी सावंत, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे सहसंस्थापक  राज देशमुख, रासेयो संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. संतोष परचुरे आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन मुख्य कार्यक्रारी अधिकारी  तेजस गुजराथी यांनी केले. त्या ठिकाणी सुमारे १०००+ भाविक आणि विद्यार्थी वारकरी उपस्थित होते. २३ जून ला रवाना झालेली “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी” ही १८ दिवसांनी पंढरपूरला १० जुलै रोजी आषाढी एकादशीला पोहचली.

कोविडच्या २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, महाराष्ट्र पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या ‘विठू-माऊली’च्या जयघोषाने दुमदुमला. १८ वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे वारी आयोजित केली जात आहे. प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना सादर केल्या जातात त्यामुळे यंदा “वारी पंढरीची, वारी लोकशाहीची” ही संकल्पना प्रस्तावित करण्यात आली आहे. मतदारांची संख्या वाढवणे व मतदानाबाबत जनजागृती करणे हे उद्दिष्ट लोकशाही वारीचे आहे. “वारी पंढरीची, वारी लोकशाहीची” संकल्पना ही सुदृढ लोकशाहीसाठी एक वैचारिक आणि अभिनव देणगी आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे आणि वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक  पराग मते यांच्या समन्वयातून ही चळवळ उभी राहिली .माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांतील २०० विद्यार्थी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी” चा भाग बनले. या वारीमध्ये लोकशाहीचा रथ हा मुख्य आकर्षण ठरला.विद्यार्थी (वारकरी) स्वयंसेवकांनी लैंगिक समानता, अप्रत्यक्ष अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण, लोकशाही मूल्ये इत्यादी विविध विषयांवर सर्वेक्षण केले तसेच प्रत्येक पालखी तळावर विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या. नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलवर (NVSP) मोठ्या संख्येने लोकांची नोंदणी करून लोकशाहीच्या दिंडीने एक उंची गाठली. तसेच, जनजागृती करण्यासाठी, विद्यार्थी वारकऱ्यांनी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी- लोकशाही वारी” या संकल्पनेवर आधारित ३.५ लाखांहून अधिक वारकरी प्रेक्षकांसमोर दररोज १० वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य, भारूड, कीर्तन सादर केले. रासेयो स्वयंसेवकांनी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सर्वतोपरी स्वतःला झोकून दिले.

“सामान्यत: विद्यार्थी हिंदी चित्रपटाची गाणी गातात परंतु १८ दिवस वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करत तसेच भजन, कीर्तन, अभंग गाऊन हरिनामाचा जयघोष करत स्वयंसेवक पंढरपूर च्या दिशेने पायी प्रवास करतात. विद्यार्थी वारीमध्ये सहभागी होऊन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या भजन, कीर्तन, पथनाट्य अशा विविध कार्यक्रम मधे सहभागी होतात त्यावेळी विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ व व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. याच अनुषंगाने दरवर्षी वारीचे आयोजन केले जाते ” असे डॉ. प्रभाकर देसाई ( रासेयो संचालक, सा.फु. पू. वि.) म्हणाले. या लोकशाही वारी चे नेतृत्व वर्शिप अर्थ फाउंडेशनचे स्वप्नील पवार यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या सहकार्याने वारीची शिस्त डॉ. राजकुमार रिकामे, डॉ.विकास कर्डिले, डॉ.संदीप देशमुख, डॉ.वैशाली वाघुले, प्रा.शालिनी घुमरे, दिनेश जाधव, स्वामीराज भिसे आणि रुषिकेश चव्हाण यांनी सांभाळली व वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: