fbpx

दैनंदिन जीवनात संविधान आणि त्याची मूल्ये जपायला हवीत – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांचे मत

पुणेः भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी लढणारे बहुतांश स्वातंत्र्य सैनिक हे वकील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वकील होते त्यांनी देशाचे संविधान लिहिले. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी रोजचे आयुष्य जगताना देखील संविधान आणि त्याची मूल्ये जपायला हवीत. कायद्याचा अभ्यास करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी.असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे रेवती मोहिते डेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शुक्रवार पेठेतील महाविद्यालयाच्या जिजामाता सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड. हर्षद निंबाळकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सहसचिव विकास गोगावले, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, पद्माकर पवार, जगदीश जेधे, ॲड. एन.डी. पाटील, कमल व्यवहारे, प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वनाथ  पाटील उपस्थित होते. संस्थेचे सचिव अण्णा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. हर्षद निंबाळकर यांचे  फौजदारी कायदे या विषयावर व्याख्यान झाले.

रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, शिक्षण हे तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देते तसेच तुम्हाला ज्ञानाने समृध्द करते त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया थांबवू नका. चांगला वकील होण्यासाठी सचोटी, अभ्यासू वृत्ती आणि संयम आवश्यक आहे. अति आत्मविश्वास हा नेहमी घातक असतो, असेही त्यांनी सांगितले.

राजेंद्र उमाप म्हणाले, कायद्याचा अभ्यास करताना समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे. तसेच सामान्य माणूस म्हणून वावरायला पाहिजे. सिद्धकला भावसार यांनी सूत्रसंचालन केले. राजेश मकवाणा यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: