fbpx

उद्योजकतेला चालना देण्याचे ‘जीआयबीएफ’चे कार्य कौतुकास्पद – कलराज मिश्रा

पुणे : “सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात देशातील सर्वाधिक ११ कोटी लोकांना रोजगार दिला जातो. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) या क्षेत्राचा वाटा ३० टक्के आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून उद्योजकतेला चालना देण्याचे प्रयत्न ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) करत आहे,” असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी केले.

पुण्यातील ‘जीआयबीएफ’ या संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उद्योजकांना संधी’ या विषयावर चर्चासत्राचे, तसेच ‘नॅशनल बिझनेस एक्सेलन्स अवार्ड्स’चे नुकतेच आयोजन केले होते. प्रसंगी खासदार रामचरण बोहरा, ‘जीआयबीएफ’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, सह-संस्थापक दीपाली गडकरी आदी उपस्थित होते. जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

कलराज मिश्रा म्हणाले, “कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना देण्याची मोठी गरज देशासमोर आहे. स्थानिक उद्योगांना जागतिक बनवण्यासाठी मोठ्या उद्योजकांनी ‘एमएसएमई’सोबत एकत्र काम केले पाहिजे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योजकांनी दृढनिश्चय करून काम करावे.” देशाच्या अर्थव्यवस्थेतील ‘एमएसएमई’ क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान मोठे असून, जागतिक स्तरावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे रामचरण बोहरा म्हणाले.
डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “देशातील लोकसंख्येच्या ६५ टक्के तरुण आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ‘एमएसएमई’चा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि ‘एमएसएमई’ना पुढे नेण्यासाठी ‘जीआयबीएफ’ सातत्याने प्रयत्नशील आहे. देशात व्यवसायासोबतच रोजगाराच्या नव्या संधी वाढत आहेत.” दीपाली गडकरी म्हणाल्या, ‘एमएसएमई’ला पुढे नेण्यात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. आजही देशाच्या आर्थिक विकासात महिला येत आहेत. त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमात अनेक महिलांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: