fbpx

हिम्मत असेल तर महापौरही जनतेतून निवडावा वसंत मोरे यांचे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना आवाहन


पुणे: राज्यात अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावण्यात भाजप नेत्यांना यश आले असून शिवसेनेतील बंडखोरी यशस्वी ठरली आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी भाजपसोबत युती केली.
त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, पहिलाच निर्णय आरे कारशेडसंदर्भात घेण्यात आला. त्यामुळे, आता ठाकरे सरकारचे निर्णय मोडीत निघणार का, अशी चर्चा होत असतानाच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विट केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा, याबाबत निर्णय घेतला होता. पण महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये अस्थिर वातावरण तयार केले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडीचा निर्णय तातडीने बदलून सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे, जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीची चर्चा रंगली आहे. त्यासंदर्भातच, मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी ट्विट करत नव्या सरकारला आव्हान दिलं आहे.
माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा, असे चॅलेंज वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे. तसेच, आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.. असा विश्वाही वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: