fbpx

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : जून महिन्यात हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार ‘कम बॅक’ केला आहे. राज्यात कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावली आहे.
राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टी चा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक भागात जोरदार सरींनी हजेरी लावली. विदर्भात ही मुसळधार पावसाची नोंद झाली. सध्या दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, तो बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. त्यात दक्षिण पाकिस्तान व लगतच्या परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे राज्यात प्रवेश करत असल्याने कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. या हवामान परिस्थितीमुळे पुढील चार दिवस कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. मध्य महाराष्ट्रात ही दोन दिवस अतिवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत.
मुंबईसह संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाट परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे सध्या घाट माथ्यावर पर्यटनाला बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: