fbpx

वारीनिमित्त सायलीची सांगितीक भेट!

करोनामुळे दोन वर्ष वर्ष खंड पडलेली वारी यंदा पुन्हा त्याच उत्साहात, जल्लोषात साजरी होणार आहे. अवघं पंढरपूर विठ्ठल नामात एकरूप होणार आहे. वारकर्‍यांच्या विठ्ठल नामघोषात पंढरपूर पुन्हा एकदा दुमदुमणार असल्याने वारकरी पंढरपूरची वाट चालू लागले आहेत. पुन्हा एकदा होणाऱ्या या संगीतमय वातावरणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रसिद्ध गायिका सायली कांबळे प्रेक्षकांसाठी ‘सगुण सावळा पांडुरंग’ या अभंगाची पर्वणी घेऊन येणार आहे. हा अभंग ९ जुलै रोजी सायली कांबळे या युट्युब चॅनलवर भेटीस येणार आहे.

सायली इंडियन आयडॉल या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आपल्या गोड गळ्याने सायलीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. आता वारीनिमित्त ‘सगुण सावळा पांडुरंग’ ही सांगितीक भेट सायली घेऊन आली आहे. हा अभंग समृद्धी पांडे हिने लिहीला असून याचे संगीत आणि संगीत संयोजन प्रणव हरिदास याचे आहे. विठ्ठल हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतो. संगीताच्या माध्यमातून विठ्ठलाची विविध रूपं उलगडण्याचा प्रयत्न या अभंगातून केला आहे, अश्या भावना तिने व्यक्त केल्या. या अभंगाचे तालवाद्य संयोजन सौरभ शिर्केने केलं असून पखवाज, दिमडी वादन योगेश लोरेकर याने केले आहे. या अभंगाचे ध्वनिमुद्रण सौरभ काजरेकर, गणेश पोकळे यांनी केले असून चित्रीकरण सागर पटवर्धन आणि मंदार चोगळे यांचे आहे. ‘सगुण सावळा पांडुरंग’ हा अभंग सायली कांबळे या युट्युब चॅनलवर शनिवार ,९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘या अभंगाची चाल अतिशय प्रसन्न आणि प्रासादिक आहे. अभंग गाण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. हा अभंग लोकांना आवडेल अशी आशा करते.’ अशा शब्दांत गायिका सायली कांबळे हिने व्यक्त केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: