fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या; आरोपी जेरबंद

हुबळी : प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर आंगडी ऊर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची आज सकाळी कर्नाटकातील हुबळी येथे एका हॉटेलमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली.  गुरुजी  चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

चंद्रशेखर गुरुजी गेल्या चार दिवसांपासून एका हॉटेलमध्ये राहात होते. आज सकाळी दोन जण त्यांना भेटायला आले. त्यांनी चंद्रशेखर यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटायला बोलावले. चंद्रशेखर हॉटेलच्या लॉबीमध्ये येताच या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्यावर अनेक वार केले गेले. त्यानंतर हे दोघेही मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

या घटनेनंतर चंद्रशेखर यांना तातडीने “केआयएमएस’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दोघांपैकी एका व्यक्‍तीने गुरुजींशी बोलायला सुरुवात केल्यानंतर लगेचच त्यांना भोसकायला सुरुवात केली. गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भातील प्रकरण दाखल करून घेण्यात आले आहे असे पोलीस आयुक्‍त लभू राम यांनी सांगितले. गुरुजींची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून शोध सुरू केला होता. एसीपी विनोद यांच्या पथकाने मारेकऱ्यांना रामदुर्ग येथे ताब्यात घेतले आहे. 

महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड  दोघेही चंद्रशेखर गुरुजी यांच्याकडे काम करत होते. गुरुजींनी वनजाक्षी आणि मंजुनाथ यांचा स्वतः पुढाकार घेवून विवाह केला होता. नंतर त्यांना प्लॉटदेखील दिला होता. 2019 पर्यंत हे गुरूजींच्याकडे काम करत होते. नंतर त्यांनी काम सोडले. काम सोडल्यावर गुरुजींनी त्यांच्याकडे प्लॉट परत करण्याचा तगादा लावला होता. 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading