Wednesday, June 17, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

हॉटेल, रेस्टॉरंटच्या बिलातील सेवा शुल्क घेण्यास बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशातील हॉटेल आणि रेस्टॉरंटना ग्राहकाकडून सेवा शुल्क घेण्यास बंदी घातली आहे. जर कुठल्याही हॉटेलने ग्राहकाची इच्छा नसताना सेवा शुल्क आकारले तर ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्यात अशी सूचना जारी करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यापासून देशातील हॉटेल चालकांनी ग्राहकावर सेवा शुल्क बंधनकारक असल्याप्रमाणे सेवा सुरू आकरण्यास सुरुवात केली होती. यासंदर्भात ग्राहकांकडून तक्रारी आल्यानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने हॉटेल चालकांची बैठक बोलावून यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार एखादा ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याच्यावर अन्नपदार्थाच्या बिलाशिवाय सेवा शुल्क आकारता येणार नाही. त्याशिवाय सेवाशुल्काचे नाव बदलून अशा प्रकारचे शुल्क हॉटेलना घेता येणार नाही.

सेवाशुल्क बंधनकारक नाही. ग्राहकाने त्याची इच्छा असेल तर ते देण्यास हरकत नाही अशी स्पष्ट माहिती हॉटेल चालकांनी ग्राहकांना देण्याची गरज आहे. त्याचबरोबर एखाद्या ग्राहकाने आपण सेवा शुल्क देणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर या ग्राहकाला हॉटेलमधील प्रवेशावर कसलीही बंधने आणता येणार नाहीत.

हॉटेलच्या बिलाबरोबर सेवाशुल्काचे बिल देता येणार नाही. जर एखाद्या हॉटेल चालकाने खाद्यपदार्थाच्या बिलाबरोबर सेवा शुल्क लावले तर ते रद्द करावे असे ग्राहकांनी हॉटेल चालकाला सांगावे. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांकावर या संदर्भात तक्रार करावी. ग्राहकांना ग्राहक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे देशभरातील ग्राहकांची हॉटेलमध्ये होणारी पिळवणूक थांबण्यास मदत मिळेल असे ग्राहकांनी सांगितले आहे. या अगोदरही सरकारने अशा सूचना देऊनही काही हॉटेल चालक ग्राहकाकडून सेवा शुल्क घेत होते. आता या नव्या मार्गदर्शक सूचनामुळे यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading