….गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढवायचं आहे. यांना शिवसेना नकोय. नुसती शिवसेना फोडा नाही तर शिवसेना संपवा हा त्यांचा डाव आहे, त्यासाठी हा दाढीवाला चेहरा पुढे केला. त्यांना देखील माहिती नाही आहे. त्यांना दाबून ठेवलं आहे. त्यांचा गळा आवळून ठेवला आहे. ताबा त्यांच्या हातात आहे. काल बघितलं ना समोरून माईक खेचला. मी मुख्यमंत्री असताना असं कधी झालं नाही. पण काल बघितलं त्यांच्या पुढ्यातून माईक खेचला, त्यांना देखील कळालं नाही. आता माईक खेचलाय उद्या काय खेचतील ते बघा, अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले. काल शंभर टक्के बांधव होते, आज समोर शंभर टक्के भगिनी आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि मोकळेपणाने सांगतो की शक्ती मिळाल्याचा अनुभव आला आहे. तुम्ही सर्वजणी अमाप कष्ट करताय, तुमच्या भावना बोलता आहात, बहुतेक जणींच्या मला डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मी असा मध्ये उभा आहे, एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू…असा मधून मला मार्ग काढायचा आहे. पण मार्ग तर नक्की काढणार, असं ठाकरे म्हणाले.
मला खंत एका गोष्टीची आहे, 25-30 वर्ष सोबत राहिलो ते आपले एकदम कट्टर शत्रू झाले. 25-30 वर्ष ज्यांच्या विरुद्ध लढलो ते काँग्रेस, राष्ट्रवादी…आपल्याला सांगत होते की काँग्रेस…शरद पवार…त्यांच्यावर शिक्काचं आहे. पण ज्यांच्या वर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला. हेच माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत होते ते अजून सोबत आहेत, पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला.
विधानपरिषद मध्ये दोन्ही जागा जिंकून येतील असं म्हणत होते, आले देखील निवडून. पण 12 मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचं कपटकारस्थान कधीपासून सुरू होतं, काल ते विधानसभेत गुपीत खुललं. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा…गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला…रिक्षाचा ब्रेक फेल…त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर…आता चालवा सरकार.
