उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा अटळ – सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली – उद्या होणारी बहुमत चाचणी थांबवू शकत नाही असे म्हणत सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा अटक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मिळाला आहे. तसेच आता मुख्यमंत्री राजीनामा देणार की अविश्वास ठरावाला सामोरे जाणार याकडे लक्ष आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात म्हटंले आहे की, राज्यपालांना हे आधिवेशन बोलवण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे उद्या होणारी बहुमत चाचणी थांबवू शकत नाही. तसेच येत्या 11 तारखेला या विषया संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल. तेव्हा यावरील सर्व चर्चा संविस्तारपणे ऐकले जाईल.
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. कोर्टात अॅ ड. अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेनेची बाजू मांडली.
दरम्यान, विधानसभेच्या उपाध्यक्षांनी केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवरून बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. या काळात या बंडखोर आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तसेच विधानसभा उपाध्यक्ष, राज्य सरकार, केंंद्र व पोलिस यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या निर्णयाच्या आधारे शिवसेनेने राज्यपालांनी बोलावलेलं विशेष अधिवेशन अवैध असल्याचं म्हटले होते.
