औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी परिसरातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने करा; भाजपचे आंदोलन
पुणे : औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा दयावा, या मागणीसाठी आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त संदीप खलाटे यांच्या तर्फे कनिष्ठ अभियंता विजय भोयर यांनी स्विकारले.
या आंदोलनात माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कोथरूड मंडल अध्यक्षा उमा गाडगीळ, भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, गणेश स्वामी, प्रिती शिरोडे, पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस रेखा चोंधे, अशोक कदम, सुदेश जाधव, शिवाजी नगर युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, संतोष भिसे,योगेश केरकर,अरुण बागडी, स्वप्नील कांबळे, सागर कांबळे, आनंद माने, दीपक कांबळे,हिमांशू मुथय्या, संकेत कांबळे, सिद्धेश काटे, राजेश पवार, सरस्वती कांबळे, उषा चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी, औंधगाव,बाणेर, बालेवाडी येथे दरवर्षी पावसाळयामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी पावसाळा सुरु झाला तरही औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयामार्फत पावसाळयापूर्वीची कामे अद्याप करण्यात आली नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या मार्फत २ जून रोजी औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु झाला तरीही अद्याप ही कामे सुरु करण्यात आली नाहीत. या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
भाजप तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,चिखलवाडी बुद्ध विहारासमोरील तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडीयम येथील ड्रेनेज लाईनची स्वच्छता झाली नसल्याने, येथे रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता आहे. माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता नसल्याने या शाळेच्या मैदानावर पाणी साठते तेच पाणी स्थानिकांच्या घरात येते. तसेच माउंटवर्ड सोसायटी ते खडकी स्टेशन रोड या मार्गावर सुद्धा पावसाळ्यात पाणी साठते. औंध रोड चव्हाण वस्ती येथील पाठीमागील बाजूस असलेले चेंबर्स मध्ये गाळ साचल्याने तेथे ड्रेनेजचे पाणी साठून राहते. पावसाळ्यापूर्वी या ड्रेनेजमधील गाळ काढला पाहिजे.
