उद्धवजी, तुमच्या बडव्यांनी आमची व्यथा कधीच ऐकलीच नाही – आमदार संजय शिरसाट 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीत राहायचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन मिळणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्यातच आता एका आमदाराने पत्रातून भावना व्यक्त केली आहे.

औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी तीन पानी पत्र लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. त्यामध्ये, बडव्यांपासून होणारा त्रास, मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर ताटकळत बसावं लागणं आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन अयोध्या दौऱ्यावेळी झालेली अवहेलना शिरसाट यांनी पत्रातून मांडली आहे.
पत्रातील शिरसाट यांनी एका वाक्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावरच बोळा फिरवाल आहे. या पत्रातून शिरसाट यांनी थेट मुद्द्याला हात घालत मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर सवालच केला आहे. काल तुम्ही जे काही बोललात. जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं, असं शिरसाट यांनी या पत्रात नमूद करून थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे.

बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. 3 ते 4 लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? हा आमचा सवाल आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कुठे कुठे चुकले आहेत, याचा पाढाच जणू या पत्रातून वाचण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: