शिक्षणातली ही पाच वर्षे झपाटल्यासारखी जगा – प्रवीण तरडे

पुणे : आयुष्यातील शिक्षणाची ही पाच वर्षेच तुमच्या पुढील पंचवीस वर्षाचे भविष्य घडवत असतात त्यामुळे ही पाच वर्षे झपाटल्यासारखी जगा, स्वस्थ बसू नका सातत्याने आपल्याला ज्यात रस आहे अशा गोष्टी करत रहा असा सल्ला अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व चापेकर बंधुंच्या पराक्रमाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवा निमित्त ‘स्मरण क्रांतिवीरांचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रविण तरडे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिसभा सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, डॉ. विलास उगले, डॉ. सुधाकर जाधवर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई तसेच सर्व अधिष्ठाता व अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. संतोष परचुरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले.

यावेळी तरडे म्हणाले, मी सहा वर्षे विद्यापीठात होतो. त्यातील तीन वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेतही होतो. माझ्या काळात विद्यापीठाला कबड्डी व व्हॉलीबॉल मध्ये सुवर्णपदकही मिळालेलं. आज २३ वर्षांनी पुन्हा विद्यापीठात आलो आणि त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. या निमित्ताने मुलांना हाच सल्ला देईन की या काळात तुम्ही स्वतःला झोकून देऊन अभ्यास करा, खेळा, कला कौशल्य मिळवा. ही पाच वर्षे तुम्हाला प्रविण तरडे, मुक्ता बर्वे आणि अश्याच मोठ्या व्यक्ती बनवतील.

यावेळी स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी, स्वस्थ वारी, लोकशाही वारी अशा संदेश देत विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वारीत सहभागी झाले. मागील अठरा वर्षांपासून विद्यापीठात या दिंडीची अखंड परंपरा सुरू आहे. यावेळी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसोबत निवडणूक आयोगाचे अधिकारीही उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: