Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा 50 वर्षाहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात धरणे उभारण्यात आली. सिंचन क्षेत्र वाढले आहे. पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतात, शेतकरी समृध्द होताना पाहणे हा गौरव आहे. दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

दूधगंगा डावा कालवा पाणी पूजून शुभप्रसंगी बोलताना सतेज पाटील बोलत होते.

ते म्हणाले, या पंचक्रोशीतील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सामुदायिक पध्दतीने उत्पन्न खर्च कमी करून उत्पन्न वाढले पाहिजे. नव्या युवा पिढीने एकत्र येवून एकत्रित शेती करून नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच बाजार वाढीस वाव दिला पाहिजे. जिल्ह्यात यावर्षी ड्रोन पध्दतीने शेतीचा प्रयोग करण्यास चालना देताना प्रायोगिक तत्वावर प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, या चारही गावातील पाण्याचा प्रश्न सोडविताना विशेष आनंद होतो आहे. सोबतचे शेतीसाठीही पाणी मिळाल्याने 4 हजार पेक्षा अधिक सिंचन क्षेत्रास याचा लाभ होऊन या भागातील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी् येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, प्रकाश पाटील, शिशिकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संध्याराणी बेडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील, पांडुरंग भांदिगरे, केडीसीसी बँकेचे संचालिका स्मिता गवळी, पंचायत समिती माजी उपसभापती सागर पाटील-निगवे, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, सहायक अभियंता अजिंक्य पाटील, दुधगंगा कालवे क्र.1 च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पारीख आदी उपस्थित होते.

अशी आहे दूधगंगा कालवा कामाची सद्यस्थिती

दूधगंगा डावा कालवा 76 कि.मी. लांबीचा आहे. या प्रकल्पाद्वारे डाव्या कालव्यावरून राधानगरीतील 22 गावे, करवीर तालुक्यातील 11 गावे, कागल तालुक्यातील 8 गावे, हातकणंगले-2 गावे असे एकूण 43 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 1 ते 31 कि.मी. (माजगांवपर्यंत) कामे सन 2000 अखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित 32 ते 65कि.मी. पर्यंतची काम पूर्ण असून पाणी सोडणेकरिता कालवा तयार आहे. उर्वरित 66 ते 76 कि.मी. माहे जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे जवळपास 7 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading