fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

 कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील – उद्धव ठाकरे 

मुंबई  : कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.

१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading