अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
मुंबई : पंजाबी सिंगर शुभदीप सिंग सिंधू याला काही दिवसांपूर्वी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच; आता अभिनेता सलमान खान याला ‘मुसा वाला जेसा कर दुंगा’ असे लिहीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी बांद्रा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकांना मिळाले आहे. सलीम खान रवीवारी नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा ते ज्या ठिकाणी थोडावेळ बसले होते, त्या बेंचवर हे पत्र ठेवलेले आढळले. सुरक्षा रक्षकांनी हे पत्र सलीम खान यांना दिले व त्यानंतर बांद्रा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये ‘मुसा वाला जेसा कर दुंगा’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच यामध्ये सलमान व सलीम खान या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, पंजाबी सिंगर शुभदीप सिंग सिंधू याला काही दिवसांपूर्वी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याला सिंधू मुसेवाला या नावाने ओळखले जात होते. धमकीच्या पत्रात याच नावाचा उल्लेख करण्यात आल्याने बॉलीवूड मध्ये भीतीचे वातावरण तयार होवू लागले आहे.
