‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ची ‘टेरागो लॉजिस्टिक्स’शी भागीदारी

मुंबई : महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (एमईएमएल) या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या विद्युत तिचाकी उत्पादक कंपनीने दिल्ली येथील ‘टेरागो लॉजिस्टिक्स’ या स्टार्ट-अपशी भागीदारी केली आहे. ‘टेरागो’कडे सध्या महिंद्रा ट्रिओ झोर या मालवाहू वाहनांचा ६५ इतका ताफा आहे. ‘बिग बास्केट’ या ऑनलाइन किराणा स्टोअरसाठी तीन शहरांमध्ये आणि ‘पोर्टर’ या आघाडीच्या लॉजिस्टिक कंपनीसाठी हा ताफा ‘टेरागो’ने तैनात केला आहे. येत्या काही महिन्यांत, ‘टेरागो’च्या या शून्य-प्रदूषण ताफ्याच्या विस्तारासाठी ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’तर्फे आणखी विद्युत वाहने पुरविण्यात येणार आहेत.

‘महिंद्रा’चे ‘ट्रिओ जोर’ हे मालवाहू प्रकारातील विद्युत तीनचाकी वाहन २०२० मध्ये भारतात सादर करण्यात आले. त्याच्या बॉडीच्या प्रकारानुसार त्याचे अनेक उपयोग करता येतात. 8 kW इतकी उत्कृष्ट शक्ती आणि 42 Nm इतका उच्च स्वरुपाचा टॉर्क अशी वैशिष्ट्ये असलेले ‘झोर’ हे वाहन ‘ट्रिओ प्लॅटफॉर्म’वर तयार केले गेले आहे. ५५० केजी इतका ‘पेलोड’ ते घेऊ शकते. या श्रेणीच्या वाहनांमध्ये ही ताकद सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत, ‘महिंद्रा’ने प्रवासी आणि मालवाहू विभागात १८ हजारांहून अधिक ‘ट्रिओ’ विद्युत तीनचाकी वाहनांची विक्री केली आहे. या विशिष्ट विभागात कंपनीचा बाजारहिस्सा ७३.४ टक्के आहे*. ‘ट्रिओ’ची निर्यात यूके आणि नेपाळ येथील बाजारपेठांमध्ये केली जाते.

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, “आमच्या ‘महिंद्रा ट्रिओ जोर’ विद्युत तिचाकी वाहनांचा वापर अगदी सुरुवातीच्या काळापासून करणाऱ्या ग्राहकांपैकी ‘टेरागो’ ही एक आहे. ‘ट्रिओ जोर’मुळे होणारी मोठी बचत आणि घातक वायूंचे शून्य उत्सर्जन यांमुळे लास्ट-माईल डिलिव्हरी वितरण व्यवस्था असणाऱ्या कंपन्या कार्यक्षम व शाश्वत वाहतुकीसाठी या वाहनाला प्राधान्य देत आहेत. आमची भागीदारी ही केवळ कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्दिष्टांलाच गती देईल असे नाही, तर विद्युत वाहनांचा वापर करण्यास इतरांनादेखील उद्युक्त करेल.”

टेरागो लॉजिस्टिक्सचे सह-संस्थापक मोहन रामास्वामी म्हणाले, “लास्ट-माईल डिलिव्हरीसाठी ‘महिंद्रा ट्रिओ झोर’सारख्या विद्युत तीनचाकी वाहनाचा वापर करण्यात भारतातील एक अग्रणी असल्याचा आम्हांला अभिमान वाटतो. वितरणाच्या कामासाठी उत्सर्जन-विरहीत वाहने आम्ही वापरत असल्याने शहरांतर्गत होणाऱ्या लॉजिस्टिक्सवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. विद्युत वाहनांचा अवलंब वाढविण्यासाठी ‘टेरागो’ने ‘महिंद्रा’शी केलेल्या भागीदारीतून, देशातील कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची सामाजिक जबाबदारी आम्ही आपल्या परीने पूर्ण करीत आहोत.”

Leave a Reply

%d bloggers like this: