सतार-तबला वादनामुळे संगीत रसिकांची अक्षय्य तृतीयेची संध्याकाळ संगीतमय
पुणे : शाकीर खान आणि पं.विजय घाटे यांच्या सतार आणि तबला वादनाने रसिकांची अक्षय्य तृतीयेची संध्याकाळ संगीतमय झाली. पौड रस्ता वनाज जवळ असलेल्या डेंगळे आर्ट गॅलरी मध्ये सदर मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते पद्मश्री विजय घाटे यांच्या तालचक्र तबला अकादमीच्या उद्घाटनाचे. शाकीर खान यांचे बहारदार सतारवादन आणि त्याला पं. विजय घाटे यांच्या तबलावादनाची मिळालेली साथ यामुळे ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
शाकीर खान यांनी राग यमन सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप, ताल दृपदमध्ये विलंबित गत, मध्य लय आणि दृत तीन ताल सादर केले. त्यानंतर मिश्र खमाज मध्ये धून म्हणजेच अनार आना यांचे वादन केले. यावेळी गायक राहुल देशपांडे, पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, पं. अतुलकुमार उपाध्ये, सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलींद कुलकर्णी यांनी केले.