जोपर्यंत भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – राज ठाकरे

मुंबई : “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मशिदीवरील भोंग्याविरोधात आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भोंगे बंद करण्यात आले. मात्र अजुनही अनेक ठिकाणचे भोंगे सुरू आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार डेसीबलची मर्यादा राखून भोंगे सुरू आहेत, असे सांगितले जात आहे. पण रोज हे असणार नाही. हे एक दिवसाचे आंदोलन नाही. त्यामुळे जोपर्यंत भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. मग ते मशिदीवरचे असो वा मंदिरांवरचे ते उतरलेच पाहिजेत” असा पुनरूच्चार आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

राज्यातील पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

… तर संभाजीनगरमधील सभेतच दंगल भडकवली असती  

आम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा सामाजिक असून धार्मिक नाही. याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. मला दंगल भडकवायची असती तर संभाजीनगरमधील सभेत दंगल भडकवली असती. संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरु असताना बांग दिली गेली, त्यावेळी हे मी पोलिसांना सांगितलं, अन्यथा भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं सांगा? असा प्रश्ननही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांततेत सांगतो, तर पोलिसांनी आणि सरकारने ऐकून घ्यावं असं आव्हानही राज ठाकरे यांनी केले.

‘त्या’ मौलवींचे आभार 

ताज्यात जवळपास 90-92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. त्या लाऊडस्पीकर न लावणाऱ्या मौलवींचे मी आभार मानतो, असे राज ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.

त्या 135 मशिदींवर कारवाई होणार का?

राज ठाकरे म्हणाले, काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितले. पण आज मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवालही राज ठाकरेंनी यांनी पोलिसांना केला. तसेच मुंबईतील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत, त्या अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी काय देता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

%d bloggers like this: