छत्रपतींच्या समाधीचे काम लोकमान्य टिळकांच्या हयातीत नाही मात्र त्यांच्याच पुढाकाराने – शिवाजी रायगड स्मारक मंडळ   

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरील समाधी बाबत जो काही दिवसांपासून वाद सुरू आहे . त्याची माहिती शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आज देण्यात आली. छत्रपतींच्या समाधीसाठी १९२५ साली कामाला सुरुवात करण्यात आली आणि वर्षभरात काम पूर्ण देखील झाले. टिळकांच्या हयातीत काम पूर्ण व्हायला पाहिजे होते. पण ते झाले नाही. मात्र लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने झाले. त्यावर कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका शिवाजी रायगड स्मारक मंडळमार्फत मांडण्यात आली.

या पत्रकार परिषदेला शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, मंडळाचे सर कार्यवाहक पांडुरंग बलकवडे, माजी अध्यक्ष जगदीश कदम आणि लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक उपस्थित होते.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने १८९५ साली शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना झाली. त्या माध्यमांतून अनेक कामे करण्यात आली. त्याच दरम्यान रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरीसह समाधी बांधली जावी, अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये आली. त्यानुसार या कामासाठी लागणारा निधी प्रत्येकाकडून गोळा करण्यात आला. समाधी स्थळ उभारण्यासाठी जवळपास २७ हजार रुपये लोकवर्गणीतून उभे राहिले. हे सर्व पैसे त्यांनी एका बॅंकेत ठेवले. पण ही बँक काही महिन्यांमध्ये दिवाळखोरीत निघाली आणि पैसे बुडाले. मात्र त्यानंतरही लोकमान्य टिळक यांनी हार न मानता.पुन्हा लोकवर्गणीतून पैसे उभारले. पण त्याच दरम्यान लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. छत्रपतींच्या समाधीसाठी १९२५ साली कामाला सुरुवात करण्यात आली आणि वर्षभरात काम पूर्ण देखील झाले.

बलकवडे म्हणाले, एका गोष्टीची कायम खंत आहे की, लोकमान्य टिळक यांच्या हयातीत काम पूर्ण झाले पाहिजे होते. पण ते झाले नाही. मात्र लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणेतून हे काम झाले आहे. तसेच लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही विधाने दोन दिवसापासून करण्यात येत आहेत. याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करीत असून यावर कोणीही राजकारण करू नये, असेही पांडुरंग बलकवडे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: