पुण्यातील प्राजक्ता काळे यांना “जिजामाता कृषीभूषण पुरस्कार” प्रदान

पुणे : पुण्यातील प्रख्यात आंतरराष्ट्रीय बोन्साय मास्टर डॉ. प्राजक्ता काळे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याच्या मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

राज्याच्या कृषी विभागातर्फे राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुषंगाने २०१८ व २०१९ या वर्षांकरिता देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्राजक्ता काळे म्हणाल्या की, भारतात उगम पावलेली ही कला ‘वामन वृक्ष कला’ या नावाने ओळखली जाते. बोन्साय झाडे बनवण्यासाठी आपल्या देशात 15,000 हून अधिक झाडांच्या प्रजाती आहेत. या जिवंत कलेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी “बोन्साय नमस्ते” च्या माध्यमातून भारतात एक चळवळ सुरू केली आहे. गेली ३८ वर्ष सातत्याने या कलेचे महत्त्व वाढवण्यासाठी व प्रसार करण्यासाठी काम करताना तरुण, महिला, शेतकरी, विद्यार्थी, लहान रोपवाटिका मालक अशा सर्वांसाठी ही कला कौशल्य म्हणून भारतात रोजगाराचे माध्यम बनवण्याचा निर्णय घेतला.”

डॉ. प्राजक्ता काळे यांनी बोन्साय कलेबद्दल जाणून घेण्यासाठी पुस्तके लिहिली आहेत. बोन्साय मास्टर म्हणून, त्यांनी जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय बोन्साय संस्थांनी त्यांना विशेष कामगिरी व अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. 3333 क्रमांकाच्या बोन्साय झाडांच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनासाठी “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक” म्हणून त्या जगातील पहिल्या महिला आहेत. त्यांना सन २०२० मध्ये फ्रांस मधील युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती. बोन्साय या कलेसाठी डॉक्टरेट मिळविणा-या त्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. डॉ. प्राजक्ता काळे यांनी भारतातील सर्वात मोठे बोन्साय (वामन वृक्ष) गार्डन तयार केले आहे जिथे या कलेसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: