‘सोशल मीडियावर मराठीत मोठ्या प्रमाणावर कंटेंट’ दुसऱ्या सोशल मीडिया संमेलनाचे उद्घाटन

पुणे : मराठीमधून आता मोठ्या प्रमाणावर कंटेंट तयार होत असून, हे एक आशादायक चित्र असल्याचे मत मधुरा रेसिपीज या युट्यूब चॅनेलच्या संचालिका मधुरा बाचल यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट्स यांच्या आयोजित दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे आज पुणे विद्यापीठाच्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये एका दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्रकुलगुरू एन. एस. उमराणी, सतीश मगर, सुमन धामणे, जयंती वाघधरे, डॉ. राजेश पांडे, विनायक रासकर, प्रसेनजीत फडणवीस, प्रदीप लोखंडे, मंगेश वाघ, समीर आठल्ये यावेळी उपस्थित होते.

मधुरा बाचल यांच्या युट्यूब चॅनेलला ६३ लाखांच्या वर फॉलोअर आहेत. त्या म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी मला स्वतःला सोशल मीडियावर एकटीच (नोमाड) असल्याचे जाणवायचे. आता मात्र मोठ्या प्रमाणावर मराठीमध्ये कंटेंट तयार होत असून, हे खूप उत्साह आणणारे आणि आशादायक चित्र आहे. त्याचा मराठीला ही खुप फायदा होत आहे.”

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “आम्ही विद्यापीठ म्हणून लाखो विद्यार्थी आणि इतरांनाही जोडलेले आहोत. या संमेलनामुळे सोशल मीडियाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि जागृती होईल. लोखंडे म्हणाले, “सोशल मीडियाने सगळ्यांना एका पातळीवर आणले आहे. या सगळ्याकडे एका व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास एक मोठी संधी आहे. त्यातून भारताला जगभरात पुढे येण्यासाठी मदत होईल.

मंगेश वाघ यांनी प्रास्ताविक केले आणि संमेलनाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, “सोशल मीडियावर वावरणाऱ्या सगळ्यांचे हे संमेलन आहे. सोशल मीडियामुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण व्यक्त होत आहे. त्या व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाचे हे संमेलन आहे. जगातल्या १५ कोटी मराठी भाषकांच्या हा उत्सव आहे.” यावेळी सुमन धामणे, सतीश मगर यांचीही भाषणे झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: