ताणतणाव व्यवस्थापनासाठी चांगले मित्र जोडा – कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी चांगले मित्र जोडण्याचा सल्ला पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिला.

‘निरामय’ संस्थेच्या ‘किशोरी नारी प्रकल्पा’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग भावनांचे’ या निवासी प्रशिक्षण शिबिर आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात देसाई बोलत होते.

आमदार माधुरी मिसाळ, ए. जी. डायग्नोस्टिकच्या डॉ. विनंती पाटणकर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, प्रकल्प प्रमुख साधना पवार, उद्योजक गजेंद्र पवार, ज्योतिकुमार कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

देसाई म्हणाले, जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रचंड अडचणी येत असतात. त्या स्वत:पुरता न ठेवता मित्र आणि कुटुंबियांना सांगा. त्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शारिरीक आणि मानसिक क्षमतांबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्याची गरज आहे.

मिसाळ म्हणाल्या, ‘उच्च ध्येय, मनाची क्षमता, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी, सकारात्मकता, सहनशीलता आणि संघर्ष करण्याची तयारी हे गुण मुलींना यशस्वी करतात. यश मिळविल्यानंतरही जे जमिनीवर राहातात तेच उंच भरारी घेऊ शकतात. त्यासाठी संकटातील संधी ओळखून यश मिळविले पाहिजे.’

तीन दिवसांच्या शिबिरात वस्ती विभागातील सातशे विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, शैक्षणिक, समुपदेशन, स्वसंरक्षण आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे. ॲड. जैन यांनी प्रास्ताविक, साधना पवार यांनी स्वागत, दीपा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: