Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

भागवत हा जीवनाला विचाराची दिशा देणारा ग्रंथ – ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर

पुणे : भागवत कथा ही तत्वज्ञानाच्या अधिष्ठानावर उभी आहे. त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे. विस्तार आणि संकोच अशा दोन्ही रुपाने कथा सांगितली जाते. विस्तार व संकोचाचे गणित ग्रंथ लेखन करताना सांभाळावे लागते. दोन्हीच्या मर्यादा लेखकाने ओळखणे गरजेचे असते. भागवत हा जीवनाला विचाराची दिशा देणारा ग्रंथ आहे, असे मत ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.

श्री सद््गुरु श्रीधर दत्तात्रेय सेवा प्रतिष्ठान, पुणे तर्फे भागवताचार्य विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी यांनी श्रीमद् भागवत महापुराण या ग्रंथावर आधारित दैनंदिन भक्तीरसवर्धिनी ३६५ प्रवचने, श्रीधरटीकेनुसार लिहिली आहेत, तसेच श्री एकनाथी भागवत या ग्रंथावर आधारित गद्य भावानुवाद विवरण या ग्रंथांचे प्रकाशन नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात झाले. यावेळी योगेश्वर गोखले, भागवताचार्य व ग्रंथांचे लेखक अजित कुलकर्णी, प्रतिष्ठानचे विश्वस्त वैद्य सर्वेश कुलकर्णी व वेददत्त कुलकर्णी उपस्थित होते.

चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, भागवताचार्य अजित कुलकर्णी यांचे संपूर्ण आयुषय भागवताच्या चिंतनात गेले. त्यांनी निरपेक्षपणे भागवतावर प्रेम केले आहे. चांगला वक्ता व श्रोता एकत्र येणे कठिण आहे. मात्र, अजित कुलकर्णींच्या बाबत हे शक्य झाले आहे. सातत्याने कथा सांगणा-यांवर चांगला श्रोता तयार करण्याची जबाबदारी आहे. तरच वक्त्याने केलेल्या अभ्यासाला न्याय मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी म्हणाले, श्रीमद् भागवत महापुराणम या ग्रंथामधील १८ हजार श्लोकांवर आधारित ३६५ प्रवचने लिहिली आहेत. दोन खंडांमध्ये विभागलेल्या या ग्रंथाची पृष्ठसंख्या सुमारे १ हजार पाने असून वेगवेगळ्या प्रसंगांची ७५ रंगीत चित्रे देखील ग्रंथाची शोभा वाढवितात. मानवी जीवनासाठी मार्गदर्शक मूल्ये ग्रंथामध्ये प्रत्येक दिवसाच्या शेवटी मांडण्यात आली आहेत, हे ग्रंथाचे वैशिष्टय आहे.

वैद्य सर्वेश कुलकर्णी म्हणाले, भगवंत हा कृपासाध्य आहे. भगवंताची भक्तावर कृपा होणे अत्यंत गरजेचे आहे. श्री एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये एकनाथी भागवतावरील प्रत्येक अध्यायावर गद्यानुवाद्यात्मक एक प्रवचन अशी रचना करण्यात आली आहे. सदर ग्रंथाची पृष्ठरचना सुमारे ५५० पानांची असून आशय व्यक्त करण्यासाठी समर्पक रेखाचित्रांचा समावेश देखील करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. योगेश्वर गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading