….अशी तयार झाली ‘महा मिनिस्टर’ची 11 लाखांची पैठणी  

पुणे : साधारण 2004 मध्ये महाराष्ट्रातील गृहीणींचा सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘होम मिनिस्टर’ या शो ला सुरूवात झाली. जिंकणाऱ्याला पैठणी अशी थीम असलेल्या या शो ने महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. अन् पैठणीला सर्व महिलांवर्गातून मागणी यायला सुरूवात झाली. आता तर ‘महा मिनिस्टर’ घेवून आले आहे 11 लाखांची पैठणी. यातील हीरे आणि सोन्याची जर यामुळे ही खास आहेसच पण हिला बनवणारे हातही प्रतिभा संपन्न आणि विशेष आहेत.

येवला येथील प्रसिद्ध बाळकृष्ण कापसे यांची प्रस्तुती असलेली ही पैठणी विशेष दिव्यांग व्यक्तींनी बनवली आहे. त्यामुळे ज्या ‘माऊली’ला ही पैठणी मिळेल तिला केवळ पैठणीच नाही तर या सर्व कारागिरांचे आशीर्वादाही मिळणार आहे. जेव्हा अशी पैठणी तयार करायची ही संकल्पना पुढे आली तेव्हा त्यात हीरे आणि सोन्याची जर बसवावी हे आपसूकच आलं. पण विशेष दिव्यांग व्यक्तींच्या हातांनी ही बनवली गेल्याने ती कैक मोलाची झाली आहे. ‘महा मिनिस्टर’ला 11 लाखांची पैठणी हा केवळ एक अनोखा उपक्रम नाही, तर विणकाम क्षेत्राला, विशेषतः पैठणी साडी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल, असे मत शोच्या निर्मात्यांकडून व्यक्त केले गेले आहे.

या पैठणी बद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, ११ लाखांची पैठणी कशी असेल? हि पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे. आता महामिनिस्टर मध्ये विजेत्या वहिनीला जी ११ लाखांची पैठणी देण्यात येणार आहे ती पैठणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून खरेदी होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याच्या पैठणी उद्योगाला बळ मिळेल. इतकंच नव्हे तर या ११ लाखांच्या पैठणीच वैशिष्ट्य असं आहे कि हि पैठणी अपंग कारागिरांनी बनवली आहे. महाराष्ट्र महावस्त्र असलेल्या या पैठणीवर जरी सोन्याची जर आणि हिरे असले तरी ते नक्षीकाम करणारे कारागीर पण खास आणि प्रतिभावान आहेत यापेक्षा कौतुकाची बाब काय असेल. ज्यांचे लोकडाऊनच्या काळात रोजगार गेले अशा हातांना यामुळे रोजगार मिळाले. अन् आज त्याच विशेष दिव्यांग व्यक्तीं या उद्योगातून आपले कुटूंब चालवत आहेत. ही समाधानाची बाब आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: