शिक्षणाशिवाय केलेल्या संघर्षाला महत्व नाही – डॉ.न.म.जोशी

पुणे : शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिला. त्यातील शिका आणि संघटित व्हा, याला महत्त्व आहे. कारण याशिवाय केलेल्या संघर्षाला काही महत्त्व नाही. ज्ञान हे अमृत आहे आणि ज्ञान अमृताने तुमच्या जीवनाचे भले होईल, हा एकमेव असा संदेश जर आपण घेतला आणि ज्ञानमार्गी झालो तर पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. व्याख्यानमालेचा समारोप डॉ.न.म.जोशी यांच्या व्याख्यानाने झाला. यावेळी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.

डॉ.न.म.जोशी म्हणाले, कोणत्याही मोठ्या पुरुषाचे चरित्र त्याची जन्मतारीख आणि त्याची मृत्यू तारीख एवढ्यापुरतेच मर्यादित नसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे द्र्रष्टेपण त्यांच्या ज्ञान साधनेत आहे. सामान्य माणसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून वाचनाचा व्यासंग घ्यावा. आज स्त्रिया सन्मानाने वावरताना दिसतात, त्याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांना देखील जाते, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्याख्यानमालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री सक्षमीकरण या विषयीचे विचार, डॉ.आंबेडकरांचे संविधान समितीमधील योगदान, डॉ.आंबेडकर आणि संविधान, डॉ.आंबेडकरांचे शेतीविषयक विचार, डॉ.आंबेडकर यांचे परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षेविषयी विचार, लोकशाहितील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, घटनात्मक आर्थिक समतचे उद््दीष्टय आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना, डॉ.आंबेडकर यांचे आर्थिक विचार आदी विषयांवर नामवंत वक्त्यांनी विचार मांडले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. धनंजय लोखंडे, युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह संदीप बर्वे, प्रख्यात वक्ते डॉ.श्रीमंत कोकाटे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.विजय खरे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.असिम सरोदे, व्हेंचर्स प्रा. लि. चे संचालक अविचल धिवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, पुणे चे विभागीय संचालक डॉ.गौतम बेंगाळे आदींची व्याख्याने झाली. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या https://www.youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने सर्वांना पाहता येणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: