राज ठाकरे औरंगाबादला जाण्यापूर्वी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 1 मे ला औरंगाबाद ला जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वी ते 28 तारखे पासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.

मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. ३ मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन झालेले आहे. महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे. मनसे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राज ठाकरेंची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्याची घोषणा त्यांनी पुण्यातून केली होती. आगामी पुणे महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंचा पुणे दौरा महत्त्वाचा आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. अनेकांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

राज ठाकरेंनी पुण्यातून दोन घोषणा केल्या होत्या. पहिली म्हणजे १ मेला औरंगाबादला सभा आणि दुसरी म्हणजे अयोध्या दौरा. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला पोलीस प्रशासनाने अजून परवानगी दिलेली नाही. आगामी काळात अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मनसेची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पुणे हा मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला राहिला आहे. अनेक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात पक्ष भक्कम करण्यासाठी राज ठाकरेंचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: