किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; सोमय्या यांचा खार पोलिसठाण्यात ठिय्या

मुंबई : दिवसभर हाय होल्टेज ड्रामा केलेल्या राणा दांपत्यांना भेटून परतत असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या गेल्या. दरम्यान, किरीट सोमय्या हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देऊन बसले आहेत.

आज रात्री आपण खार पोलीस स्टेशनमध्येच जाणार असल्याचे पूर्वीच कळवले होते. त्यानुसार किरीट सोमय्या हे राणा दांपत्यांना यांना भेटायला गेले होते. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटली. यामध्ये किरीट सोमय्या जखमी झाल्याचं दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत नाही तोवर येथून हालणार नाही 

त्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले की, “पोलिसांच्या उपस्थितीत मला मारहाण केली. पोलिसांच्या उपस्थितीत गुंड पोलीस स्टेशनच्या आवारात शिरतात. शिवसैनिकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत नाही, तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही.”

किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, “पोलीस स्टेशनच्या आवारात हा हल्ला झाला असून राज्याची अवस्था ही पश्चिम बंगालपेक्षा वाईट झाली आहे. पोलिसांनी राणांवर गुन्हा दाखल केला पण शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला नाही. राज्य शासन पोलिसांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे. याचं उत्तर आता भाजप त्याच प्रकारे देईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: