संघर्ष, नूमवि, बाणेर युवा, महाराणा प्रताप, सचिन दोडके, एसबी स्पोर्ट्स संघ मुख्य फेरीत दाखल

पुणे : संघर्ष क्रीडा मंडळ, नूमवी, बाणेर युवा, महाराणा प्रताप युवा मंडळ, सचिनभाऊ दोडके क्रीडा प्रतिष्ठान, एस बी स्पोर्ट्स, पळसदेव संघांनी पूना अँमच्युअर्स कब्बडी संघटना, शिवसेना कसबा यांच्या वतीने हिंदूहृदसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ४८ व्या कुमार-कुमारी गटाच्या ‘हिंदुहृदयसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धे’च्या मुख्य फेरीत प्रवेश केला. तर, लोणकर माध्यमिक विद्यालय संघाने कुरूंजाई माता प्रतिष्ठान संघाला पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.

नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत लोणकर माध्यमिक विद्यालय संघाने निकेश चव्हाण, पवन पाटील, शिवशंकर नरवटे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर कुरूंजाई माता प्रतिष्ठान संघाला ३५-१२ असे पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मध्यंतरला लोणकर संघाने २०-४ अशी १६ गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी कुरूंजाई संघाला कमी करता आली नाही. कुरूंजाई संघाकडून सोमनाथ शेडगे, ओम धनवे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

संघर्ष क्रीडा मंडळ, रहाटणी संघाने नवचैतन्य क्रीडा प्रतिष्ठान संघाला २८-६ असे २२ गुणांनी पराभूत केले. संघर्ष संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना मध्यांतराला १०-४ अशी ६ गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर संघर्ष संघाच्या शुभम पाटील, मनीष कर्वे व अक्षय कोळी यांनी आक्रमक खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. नवचैतन्य संघाकडून माऊली बोडके याने चांगली लढत दिली.

नूमवि संघाने जयवंत क्रीडा मंडळ संघाला १८-८ असे पराभूत केले. नूमवि संघाच्या कृष्णा जगताप व प्रणव नलावडे यांनी आक्रमक चली रचत संघाला मध्यतराला १०-२ अशी ८ गुणांची आघाडी मिळवून दिली. जयवंत क्रीडा मंडळाच्या निमेश जाधव व मनोज शिंदे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

बाणेर युवा, बाणेर  संघाने नवतरुण क्रीडा मंडळ, सासवड संघावर १७-६ असा ११ गुणांनी विजय मिळविला. बाणेर युवा संघाच्या योगेश शिंगरे, नरेंद्र साळवे, किरण सुरवसे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करताना मध्यंतराला ७-१ अशी आघाडी घेतली. राजू राठोड, करण इटकर यांनी नवतरुण संघाकडून चांगली लढत दिली.

महाराणा प्रताप युवा मंडळ संघाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संघाला २४-१० असे पराभूत केले. मध्यांतरच्या वेळी महाराणा प्रताप संघाने ९-४ अशी पाच गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर महाराणा प्रताप संघाच्या स्वप्नील कोळी, पृथ्वीराज शिंदे व देव शिर्के यांच्या आक्रमण खेळाच्या जोरावर तब्बल १५ गुणांची कमाई केली. यश गायकवाडने हनुमान संघाकडून दिलेली लढत अपुरी ठरली.

सचिनभाऊ दोडके क्रीडा प्रतिष्ठान संघाने श्री शिवाजी उदय मंडळ, चिंचवड संघाला १८-६ असे १२ गुणांनी पराभूत केले. शुभम त्रिपाठी, प्रमोद हिंगे, आयुष मोरे यांनी जोरदार आक्रमण व पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मध्यांतरला दोडके संघाने ५-१ अशी आघाडी घेतली. आदित्य चव्हाण, ओंकार बरकडे यांनी शिवाजी उदय संघाकडून दिलेली लढत अपुरी ठरली.

एस बी स्पोर्ट्स पळसदेव संघाने साहिल स्पोर्ट्स क्लब संघाला १७-११ असे ६ गुणांनी पराभूत केले. महेश माने, प्रज्योत काळे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करताना संघाला मध्यांताराला ६ गुणांची आघाडी मिळवून दिली. साहिल स्पोर्ट्स क्लब संघाकडून यश शेडगे, आदित्य पासलकर यांनी चांगली लढत दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: