‘पुण्यात सर्वसमावेशक सार्वजनिक जागांची गरज’

‘बौंजोर इंडिया २०२२’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वांसाठी पुणे’ प्रकल्पातील निष्कर्ष
पुणे : तृतीय पंथी किंवा एलजीबीटीक्यूआय समुदायाच्या सदस्यांना पुणे शहरात सुरक्षित वातावरणात वावरण्यासाठी सार्वजनिक जागा मिळणे खूप कठीण आहे. पुणे शहराला अधिक सर्वसमावेशक सार्वजनिक जागा आणि सुविधांची आवश्यकता आहे, असा निष्कर्ष ‘सर्वांसाठी पुणे’ या प्रकल्पातून पुढे आला आहे.
‘बौंजोर इंडिया २०२२’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वांसाठी पुणे’ या पाहणी प्रकल्पाचे निष्कर्ष एका चित्र-माहिती प्रदर्शनाद्वारे औंध आयटीआय रस्त्यावर प्रदर्शित करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पुण्यातील जागा आणि त्यांची काही वैशिष्ठ्ये नव्याने पुढे आली आहेत.
सोशल डिझाईन कोलॅबोरेटिव्ह, जेनर एट विले, ‘अलियाँस फ्राँसेस पुणे, पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स (पीडीए), सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, एमआयएसटी एलजीबीटीक्यू फाऊंडेशन आणि आरजू यांनी या प्रकल्पाचे आयोजन केले होते.
वास्तुविशारद स्वाती जानू आणि नागरी मानववंशशास्त्रज्ञ क्रिस ब्लॅश यांनी या प्रकल्पाचे प्रारूप तयार केले आहे. स्वाती जानू यांनी सांगितले, की या आठवड्यात, सोशल डिझाईन कोलॅबोरेटिव्ह आणि पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वास्तुविशारदांच्या टीमने पुणे शहरातील विविध भागांचा नकाशा घेऊन पुणे शहरातील ६ विविध भागांना भेट दिली. त्यांनी त्या भागातील नागरिकांशी संवाद साधला, त्यांना भेट द्यायला आवडणारी सार्वजनिक ठिकाणे नकाशावर चिन्हांकित करण्यास सांगितले आणि त्यांना कोणासोबत सार्वजनिक ठिकाणी भेट द्यायला आवडते आणि ते तेथे का जातात, अशी माहितीही जाणून घेतली.”
डहाणूकर कॉलनी, कसबा पेठ, येरवडा झोपडपट्टी, कौसर बाग, औंध गाव आणि कोरेगाव पार्क अशा ६ भागांमध्ये टीमने प्रत्येक परिसरातील किमान १०० नागरिकांशी संवाद साधला. एलजीबीटीक्यूआय आणि तृतीय पंथी समुदायातील सदस्यांचे सार्वजनिक जागांबद्दलचे दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी एक गट चर्चाही आयोजित करण्यात आली होती. या चर्चेतून आलेले मुद्दे आणि सर्व सहा भागांतील निष्कर्ष नकाशे आणि परिसरांची छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली होती.
“यातून पुणेकर आणि सार्वजनिक जागा यांच्यातील परस्पर संबंध कसे आहेत, हे पुढे आले. पुण्याची रचना, नियोजन आणि पुण्यातील वास्तुकला तसेच पुणेकर आणि त्यांचा भवताल यांच्यातील नातेसंबंध उलगडून दाखवणारा हा प्रयोग होता,” असे जानू यांनी सांगितले.
“या उपक्रमातील गट चर्चेत सहभागी झालेल्या बहुतेक एलजीबीटीक्यूआय सदस्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या साथीदारांसह सार्वजनिक ठिकाणी जाण्याची भीती वाटते. त्यांना साथीदारांसह वावरण्यासाठी घरे, स्वयंसेवी संस्थांची कार्यालये सुरक्षित वाटतात. त्यांना शहराच्या जुन्या भागपेक्षा बाणेर किंवा कोरेगाव पार्क सारख्या पुण्यातील नवीन भागांमध्ये सुरक्षित वाटते,” अशी माहिती मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक श्याम कोन्नूर यांनी दिली.
पुण्यातील सार्वजनिक जागा कोणाच्या ताब्यात आहेत? शहरात आराम करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपण सार्वजनिक जागा कशा तयार करू शकतो जिथे महिला आणि तृतीय पंथी लोकांना वावरायला आणि सुरक्षित वाटेल, शहरातील कट्ट्यांवर महिलांपेक्षा पुरूषांचे प्रमाण जास्त आहे, असे काही मुद्देही यातून पुढे आल्याचे जानू यांनी सांगितले.
पुण्यातील विविध भागांतील लोकांनी त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असल्याचे या प्रकल्पात नकाशावर खूणा करून सांगितले. कौसरबागच्या इथल्या लोकांनी खाण्याच्या दुकानांची गरज असल्याचे सांगितले. औंधच्या लोकांनी निवांतपणे फिरता येईल अशा ठिकाणांची गरज असल्याचे सांगितले. तर येरवड्यातील लोकांनी मंदिरे ही गरज असल्याचे सांगितले. कसाबा पेठेतील लोकांनी हिरवाई असलेली ठिकाणे सांगितली, तर डहाणूकर कॉलनीतील लोकांनी इतिहास आणि संस्कृती दाखवणारी ठिकाणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: