आज पराक्रम गाजविला नाही तर येणारा काळ अवघड प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे मत

पुणे  :  संतांनी समाजाला सहिष्णू बनविले तर समर्थ रामदास स्वामींनी समाजाला प्रतिकार करायला शिकवला. आपण इथे जिंकण्यासाठीच आहे ही भावना समाजामध्ये निर्माण होणे खूप गरजेचे आहे आणि ही भावना निर्माण करण्यासाठी दोन गोष्टी असणे खूप गरजेचे आहे ते म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मगौरव. आज समाज जागविण्याची आणि प्रभू श्री रामासारखा पराक्रम गाजविण्याची आवश्यकता आहे, आज पराक्रम गाजविला नाही तर, येणारा काळ अवघड आहे. असे मत अयोध्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र (न्यास) चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
मोरया प्रकाशनाच्या वतीने आधुनिक काळातील समर्थांचे महंत कै. सुनील चिंचोलकर यांची प्रेरणादायी जीवनगाथा ‘समर्थव्रती सुनील चिंचोलकर’ या पुस्तकाचे प्रकाशन  सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदीर येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष प.पू. स्वामी श्रीकान्तानंद, ज्येष्ठ प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी लेखक दिलीप महाजन, डाॅ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी उपस्थित होते. यावेळी दासबोध विवरण संचाचे देखील यावेळी प्रकाशन झाले.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या व्यक्ती आपल्या भौतिक देहाने या भुतलावर किती दिवस जगले याचे महत्त्व कमी आहे, त्या काळात त्यांनी काय काम केले हे  महत्वाचे आहे. आपले पूर्वज असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपले वडील,आपले आजोबा यांच्यासोबतच समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद, आद्य शंकराचार्य यांना आपले पूर्वज माना आणि त्यांचे कार्य लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपले कार्य करा. तसे कार्य करण्यासाठी आपली परिस्थिती निश्चितच अनुकूल आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सुनील  चिंचोलकर हे निरपेक्ष प्रेम करणारे सुहृद होते. सद्गुणांचा अथांग सागर त्यांच्यामध्ये होता.  रामाची भक्ती तर त्यांनी डोळसपणे केलीच त्यासोबत त्यांचा राष्ट्रभक्तीचा पिंड होता तो फार महत्त्वाचा होता. समर्थांचे जीवन आणि त्यांचे वांग्मय याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. प.पू. स्वामी श्रीकान्तानंद, कल्याणी नामजोशी यांनी मनोगत व्यक्त केले. गौरी देव महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: