‘मातोश्री’ रक्षणार्थ 92 वर्षीय शिवसैनिक आजी मैदानात; मुख्यमंत्र्यांकडून दखल    

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईतील सारे शिवसैनिक सज्ज झाले. दोन दिवसांपासून मातोश्री बाहेर पोलिसांबरोबरच सगळ्या शिवसैनिकांनी खडा पहारा दिला. यामध्ये एक होत्या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक तब्बल 92 वर्षांच्या आजी. ज्या युवा शिवसैनिकांसोबत सकाळपासून मातोश्रीवर पहारा देत होत्या. शरीर थकलेल होतं मात्र मनात तोच शिवसैनिकी बाणा होता. ‘मातोश्री’ रक्षणार्थ मैदानात उतरलेल्या या 92 वर्षीय शिवसैनिक आजींची खुद्द मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.

या 92 वर्षीय शिवसैनिक आजींशी ‘एबीपी माझा’ने संवाद साधला. यावेळी बोलताना आजी म्हणाल्या, “राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देत आहेत ना, म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? माझं वय 92 वर्ष आहे. आमच्या साहेबांवर संकट आलेलं आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोघजण येऊन आम्ही गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही येऊन दाखवाच. मातोश्रीवर येऊन दाखवच.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासूनच मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते मी. काही लोकं उद्धव साहेबांना सारखं छळतायत. त्यांना मी सांगते, आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही. त्यांना छळू नका. ते जनतेसाठी चांगलं काम करत आहेत. ते तुमच्यासारखी लबाडबाजी करत नाहीत.”, असा इशारा आजीबाईंनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.

दरम्यान, राणांविरोधात आंदोलन करणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर आजी काळजी घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा आजींना सांगितलं आहे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: