राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या ‘राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र’ उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरिया आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करून सहकार चळवळ टिकविण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे. नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.

स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बँकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

देशपातळीवर होत असलेल्या सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणामुळे निर्माण होणारी पोकळी भरण्याची क्षमता नागरी सहकारी बँकांमध्ये आहे. या संधीचा फायदा घेतांना बँकेच्या कामकाजासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करण्यावर भर द्यावा. सहकारी सोसायट्यांचे नाबार्ड आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संगणकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.

स्पर्धेच्या युगात प्रशिक्षण महत्वाचे-सहकारमंत्री
सहकारमंत्री पाटील म्हणाले, सहकाराला ११० वर्षापेक्षा अधिकची परंपरा आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य नागरी सहकारी बँकांनी केले. नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे चांगले काम होत आहे. संगणकीय प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर प्रशिक्षण महत्वाचे झाले आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींविषयीदेखील प्रशिक्षण केंद्राद्वारे मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्र. दि. तथा आबासाहेब शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सहकारी बँकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नंदा लोणकर आणि पुष्पलता जाधव यांना कै. मीराताई देशपांडे उत्कृष्ट महिला संचालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या प्रशिक्षणात सर्वाधिक सहभाग घेणाऱ्या आणि उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठीच्या पुरस्कारांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: