मीरा देशपांडे पुरस्कार : नंदा लोणकर व पुष्पलता जाधव यांचा गौरव
पुणे : पुणे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा कै. मीरा देशपांडे उत्कृष्ट योगदान पुरस्कार या वर्षी रामराज्य सहकारी बँकेच्या संचालिका नंदा लोणकर आणि मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी, २२ एप्रिल बालगंधर्व नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहकार व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश मोहिते, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते. मीरा देशपांडे यांनी ४० वर्षे भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संचालिका म्हणून काम पाहिले. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. बँकांच्या दैनंदिन कामकाजामध्ये महिलांचे योगदान वाढावे, सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा उमटावा यासाठी प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मीरा देशपांडे यांचे पूत्र अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनकडे ठेव ठेवली व यातून येणाऱ्या व्याजातून हा पुरस्कार देण्याची तरतूद केली. शहर व जिल्हा अशा दोन विभागात हा पुरस्कार देण्यात येणारा हा पुरस्कार शहर विभागात नंदा लोणकर व जिल्हा विभागात पुष्पलता जाधव यांना प्रदान करण्यात आला. २१००० रुपये रोख आणि सन्मानचिह्न असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.