उलगडली शंकराची विविध रुपे; सिंधू महोत्सवाचा समारोप
पुणे : अर्धनारी नटेश्वर असो वा भैरव कोतवाल, वीरभद्र असो वा देवी शंकराची अशी विविध रुपे आपण पाहतो. शंकराची ही रुपे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि त्यांची कहानी देखील तितकीच वेगळी असते. शंकराची हीच विविध रुपे भरतनाट्यम नृत्यातून उलगडण्यात आली. निमित्त होते सिंधू महोत्सवाचे.
‘सांख्य डान्स कंपनी’ आणि ‘मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या ‘सिंधू महोत्सवा’त तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना रमा वैद्यनाथन यांनी विविध नृत्यरचना सादर केल्या, तर सांख्य डान्स कंपनीच्या ग्रुपने शिव म्हणजेच शंकराची विविध रुपे आपल्या सादरीकरणातून उलगडली. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाची सांगता या सादरीकरणाने करण्यात आली. यावेळी सांख्य डान्स कंपनीचे वैभव आरेकर, सहदिग्दर्शक सुशांत जाधव, मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या पूनम गोखले हे उपस्थित होते.
प्रसिद्ध नृत्यांगना रमा वैद्यनाथन यांनी जगदीश खेबुडकर यांच्या अभंगावर आधारित नृत्य रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे पहिल्या सत्रात त्यांनी हिमालय ही नृत्यरचना सादर केली. त्यानंतर विठ्ठल नामाची शाळा भरली या अभंगावर नृत्य सादर केले व कृष्ण राधेच्या प्रेमावर आधारित अष्टपदी यावर नृत्य सादर केले.
तर दुसऱ्या सत्रात शिव या नृत्यनाटिकेमधून शंकराची विविध रुपे उलगडण्यात आली. सिंधु महोत्सवाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. वैभव आरेकर, इशा पिंगळे, मृणाल जोशी, अदिती परांजपे, राधिका करंदीकर, अनघा हरकरे, सच्चिदानंद नारायणकर आणि गौतम मराठे या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.